वेळेत उपचार मिळाले नसल्याचा नातेवाईकांचा आरोप
पुणे – करोना मृत्यूदर कमी व्हावा, अत्यवस्थ बाधिताला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी “जम्बो हॉस्पिटल’ उभारण्यात आले. हे रुग्णालय सुरू होऊन सहा दिवस झाले नाही, तोच येथे दोघांचा मृत्यूची नोंद झाली. “या दोघांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला,’ असा आरोप केला जात आहे.
तर, दुसरीकडे “अत्यवस्थ दोघांना तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. उपचारांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही,’ असे रुग्णालय संचालकांनी म्हटले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून सीओईपीच्या मैदानात 800 क्षमतेचे कोविड जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. येथे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कात्रज येथील 73 वर्षीय पुरूष आणि कोंढवा येथील 53 वर्षीय महिलेला येथे दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा तीव्र त्रास होता. त्यांना व्हेंटिलेटर लावून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे या दोघांचा मृत्यु झाला. तर महिलेला हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. त्यामध्ये डॉक्टरांकडून कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. सुजीत पाटकर यांनी सांगितले.
आरोग्य विभाग गप्प का?
या दोन मृत्यूंबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागप्रमुखांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. शहरात अशी घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग नेहमी “ऑऊट ऑफ कव्हरेज’ किंवा “माहिती घेतो’ असे सांगतो. मृत्यू झालेल्या व्यक्तींची “हिस्ट्री’ काय? हे देखील प्रशासनाला माहिती नसल्याचे दिसून येते.