नवी दिल्ली -सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर चीनी बेटिंग ऍप्स आले आहेत. त्यावरून पुणे, मुंबई, दिल्ली आणि गुडगांवमध्ये छापे टाकण्यात आले. तसेच, सुमारे 50 कोटी रूपयांची एचएसबीसी बॅंकेची 4 खाती गोठवण्यात आली.
अवैध ऑनलाईन बेटिंग ऍप्स प्रकरणी तेलंगण पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखल केला. त्याचा आधार घेऊन ईडीने संबधित प्रकरणात मनी लॉण्डरिंगची चौकशी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी पुण्यासह 4 शहरांतील 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
चीनी बेटिंग ऍप्स चालवणाऱ्या कंपन्या, त्यांचे संचालक आणि त्यांच्याशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंटच्या ठिकाणांना लक्ष्य करून छापासत्र राबवण्यात आले. त्या कारवाईवेळी 17 हार्ड डिस्क, 5 लॅपटॉप, फोन आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.
काही भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटना हाताशी धरून काही चीनी नागरिकांनी विविध भारतीय कंपन्या स्थापन केल्या. प्रारंभी त्या कंपन्या स्थापन करण्यासाठी डमी भारतीय संचालकांचा आधार घेण्यात आला. नंतर चीनी नागरिकांनी भारतात येऊन त्या कंपन्यांचे संचालकपद स्वीकारले. बॅंक खाती उघडण्यासाठी स्थानिकांचा वापर करण्यात आल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे.