लखनौ – उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसी येथील दुहेरी हत्याकांडांच्या घटनेला २४ तासही उलटले नसताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ एक हत्याकांड घडल्याची घटना समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या लखनौ येथील निवासस्थानानजीक असलेल्या रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना आज (शनिवारी) घडली आहे. उत्तर प्रदेशातून एकापाठोपाठ एक हत्याकांड समोर येत असल्याने येथील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेल्वेमध्ये उच्च पदावर अधिकारी असलेल्या आर.डी. वाजपेयी यांची पत्नी आणि मुलांची आरोपींनी घरातच गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. उत्तर प्रदेशपोलिसांतर्फे प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरातच हे हत्याकांड घडलं आहे. वाजपेयी यांची पत्नी व मुलाचा मृतदेह घरातील बेडवर आढळून आला. त्यांची मुलगी ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून, पोलिसांनी सर्व अंगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.