रांची – बिहारमधील राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सीबीआयचा वकील कोर्टात हजर राहू न शकल्याने पुढे ढकलण्यात आली असून ही सुनावणी आता 11 सप्टेंबरला होणार आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात चारा घोटाळ्याचे अनेक खटले दाखल आहेत त्यातील 33 कोटी 67 लाख रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणातील जामिनावर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.
तथापि आज झालेल्या सुनावणीच्यावेळी लालूंच्या वकिलांना कोर्टापुढे युक्तिवाद करताना सांगितले की, लालूंना या प्रकरणात जी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे त्यातील निम्म्यापेक्षा अधिक शिक्षा त्यांनी भोगली असून त्यांना जामीन मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कारागृहात त्यांची प्रकृती खूपच ढासळली असून त्यांच्यावर रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लालूंनी या चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये कारावसाची शिक्षा झाली आहे.