कोल्हापूर (प्रतिनिधी) – कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील हटवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, या मागणीसाठी आज शिवसेना कर्नाटकात दाखल झाली. याची दखल कर्नाटक सरकारने घेऊन शिवसेनेची मागणी मान्य केली आहे.
मनगुत्तीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल. त्याचबरोबर येत्या आठ दिवसात कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्नाटक सरकारने कबूल केले आहे.
कर्नाटक प्रशासन शिवसैनिकांसमोर नरमले, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुतळा बसवण्याची भूमिकायाबाबतची माहिती तहसीलदार अशोक घुराणे यांनी दिली. मात्र याबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात मोठ्या प्रमाणात दोन्ही राज्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.