पुणे – मानाच्या पहिल्या पाच गणेशांची प्रतिष्ठापना आणि एकूणच उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे या आधीच या मंडळांनी जाहीर केले होते. त्यामुळे बाहेरून कोणत्याही पाहुण्यांना न बोलावता मानाच्या गणेश मंडळांच्या अध्यक्षांनाच बोलावण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे. त्यानुसार 22 ऑगस्टला मानाच्या गणेशांची प्रतिष्ठापना अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. मानाच्या गणपती मंडळांनी भपकेबाजपणाला फाटा दिला आहेच. शिवाय कोणताही डामडौल न ठेवता आणि मंडपांचा आकारही लहान करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अशी होईल प्रतिष्ठापना…
कसबा गणपती : मानाचा पहिला गणपती
कसबा गणपतीची गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते प्रतिष्ठापनेची पूजा होणार आहे. तत्पूर्वी कसबा गणपती मंडळाने 121 कुटुंबांना कसबा गणेशाची प्रतिकृती असलेल्या मूर्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्ती देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी दहा वाजता श्रुती मंगलकार्यालय येथे होणार आहे. कसबा गणेशावरील श्रद्धेपोटी अनेक भाविक दर्शनासाठी येतील. सद्यस्थितीत त्यांनी येथे दर्शनासाठी न येता या प्रतिकृतींच्या स्वरूपातच बाप्पांची आराधना करावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले. या मूर्तींच्या बुकिंगसाठी लिंक देण्यात आली होती. त्यामध्ये 2800 जणांनी बुकिंग केले त्यातील 121 जणांची निवड करण्यात आली आहे.
तांबडी जोगेश्वरी : मानाचा दुसरा गणपती
दरवर्षी ढोल, ताशांच्या गजरात श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची पालखीतून अतिशय डौलदार पद्धतीने मिरवणूक निघते. परंतु, करोना पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करून सकाळी 11 वाजता सनई चौघड्यांच्या सुरात “श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते प्रतिष्ठापनेची पूजा केली जाणार आहे. याशिवाय संपूर्ण उत्सवकाळात साधेपणा जपण्यात येणार असून उत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब टिकार यांनी सांगितले.
गुरुजी तालीम : मानाचा तिसरा गणपती
मानाचा तिसरा असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना 12 वाजून 15 मिनिटांनी करण्यात येणार आहे. या गणेशाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि उद्योजिका जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तुळशीबाग : मानाचा चौथा गणपती
मानाचा चौथा असलेला तुळशीबागेच्या गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परिवारातील आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापनेची पूजा करण्यात येणार आहे. उत्सवकाळात मंडळाने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय विविध विषयांवर वेबिनारचे आयोजनही केले आहे.
केसरीवाडा : मानाचा पाचवा गणपती
पानाचा पाचवा असलेल्या केसरीवाड्याच्या गणेशाचे दर्शन यंदा ऑनलाइन स्वरूपात करण्याचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांनी याविषयी माहिती दिली. मिरवणूक न काढता पालखीतून “श्रीं”ची मूर्ती केसरीवाड्यात आणली जाईल. डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार असून, मानाच्या चौथ्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची आरती होईल. वेदमूर्ती परशुराम परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होणारा “गणेश याग’ हे यंदाच्या केसरी गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. पानसुपारी समारंभ रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती केसरी गणेशोत्सवाच्या संयोजिका डॉ. गीताली टिळक यांनी दिली.