पशुपालकांनी स्वगृहीच साजरा केला पोळा
शेवगाव (प्रतिनिधी) : कृषी प्रधान भारतात बैलपोळ्याला अनादि काळापासून सांस्कृतिक परंपरा आहे. शेवगावातील पोळ्यालाही प्राचीन परंपरेचा वारसा आहे. येथे सन १९१२ पासून सार्वजनिक पोळा भरतो. मात्र यंदा करोना महामारीने १०८ वर्षाची परंपरा मोडीत काढली असून पशुपालकांनी आज स्वगृहीच पोळा साजरा केला आहे. येथील देवाच्या पोळालाही यंदा सजून धजून वेशीतून प्रथम जाण्याच्या मानाला मुकावे लागले.
पोळ्याच्या दिवशी वेशीतून पहिल्यांदा बैल नेण्याच्या मानावरून वाद होतात . त्यामुळे राज्यात अनेक गावात पोळा बंदीचे आदेश लागू केले जातात. शेवगावही या वादापासून मूक्त नव्हते. शेवगावच्या वेशीतून पहिल्यांदा बैल नेण्याच्या वादावरून येथेही डोके फोडाफोडीपर्यंत मजल गेली होती. दोन पाटलांच्या मानपानावरून कोर्टकचेऱ्या झाल्या. त्यावर पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी न्यायालयात तोडगा काढण्यात येऊन या वादावर कायमचा पडदा टाकण्यात आला . तेव्हापासून म्हणजे सन १९१२ पासून गावात देवाला सोडलेल्या पोळाला वेशीतून जाण्याचा पहिला मान देण्यात आला.
त्या निर्णयानूसार गाव प्रमुख पोळ्याच्या अगोदर दोन-तीन दिवस गावातील पोळाला पकडून त्याला अंघोळ घालून सजवून पोळ्याच्या दिवशी सायंकाळी प्रथम वेशीतून सोडतात. तोपर्यंत शेवगावातील सर्व बैल पोळा मैदानावर एकत्र थांबविले जातात. त्यानंतर पोळा फुटतो. तीच प्रथा पुढे ग्रामपंचायत व आता नगर परिषद पाळते आहे.
यंदा मात्र करोनाने सर्वावर मात करत १०८ वर्षाची परंपरा प्रथमच मोडित काढली आहे . शेतकऱ्यांनी बळीराजाचे कौतूक आपापल्या घरीच केले असून देवाच्या पोळालाही आपल्या कोडकौतूकाला मुकावे लागले आहे.