उत्सवप्रमुख पुनीत बालन यांची माहिती
पुणे – यंदाचा गणेशोत्सव ऑनलाइन साजरा करणार असल्याचे “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’नेही जाहीर केले आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने करणार हे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्या उद्देशानेच ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रींची प्रतिष्ठापना सभामंडपातच होणार आहे. परंतु बाप्पांचे दर्शन मात्र ऑनलाइन घेता येणार आहे. कोणालाही दर्शनासाठी परवानगी देण्यात येणाऱ नसल्याने भाविकांनी गर्दी करू नये, असे बालन यांनी स्पष्ट केले.
बाप्पांच्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही, भाविकांना सांस्कृतिक महोत्सवासह आरतीचा लाभ फक्त ऑनलाइन घेता येणार आहे, असे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम यांनी केले आहे.
असा असेल सांस्कृतिक महोत्सव
– दि.22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत हा ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.
– पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या घेता येणार दिग्गज कलावंतांच्या मैफलींचा आस्वाद घेता येणार आहे.
– यामध्ये शंकर महादेवन, राहुल देशपांडे, पं. विजय घाटे, राकेश चौरसिया, डॉ. सलील कुलकर्णी,
नंदेश उमप, गणेश चंदनशिवे यांच्यासह लिटिल चॅम्प’ चा सहभाग असणार आहे.
– महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीही होणार आहेत.
– या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाइन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे www.shrimantbhausahebrangariganpati.com या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे.
हा सांस्कृतिक महोत्सव विनामूल्य अनुभवता येणार आहे. यामुळे गणेशभक्तांनी घरी सुरक्षित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.