नवी दिल्ली – प्राप्तीकर खात्याने बनावट चीनी कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे भारतात एक हजार कोटी रुपयांचे हवाला रॅकेट चालवणाऱ्या लुओ संग या चीनी नागरिकाला मंगळवारी रात्री अटक केली. त्याला 2018मध्ये हेरगिरीच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी अटक केली असल्याची नवी माहिती उघड होत आहे.
चार्ली पेंग उर्फ लुओ संग हा चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आणि मनी लॉंडरींग करत असल्याचा तसेच हवाला व्यवहार करत असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 2018 मध्ये ठेवला होता. मात्र त्याला न्यायलयाने पुरेशा पुराव्याअभावी सोडून दिले होते.
मनिलॉंडरिंग प्रकरणात चीनी सहभाग असल्याची विश्वासनीय माहिती मिळाल्याने प्राप्तीकर विभागाने मंगळवारी एकाचवेळी दिल्ली, गझीयाबाद आणि गुरगावात 21 ठिकाणी छापे घातले. त्या छाप्यात लुओ संग याचे नाव पुढे आले. त्याला या छाप्यात अटक करण्यात आली.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लुओ संग याची आठ ते दहा बॅंक खाती होती. त्यातून बनावट चीनी कंपन्यांच्या नावाने 300 कोटी रुपयांचे हवाला व्यवहार केले होते. रोज तीन कोटी रुपयांचे हवाला व्यवहार करत असे. त्याच्याकडे 40 बॅंक खाती बंधन बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हवाला व्यवहार जात असे. त्या बॅंक कर्मचाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. हा सर्व घोटाळा सुमारे एक हजार कोटीचा असावा, अशी शक्यता आहे.
गेली तीन वर्ष हे रॅकेट तो चालवत असल्याच संशय आहे. तो आपला पत्ताही वारंवार बदलत असे. या परदेशी हवाला व्यवहारात हॉंगकॉंग आणि अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. या चीनी नागरिकाच्या खात्यांशिवाय बनावट संस्थांच्या नावाने 40 बॅंक खाती उघडण्यात आली होती. त्यांच्याद्वारे 100 कोटी रुपयांचे कर्ज एका वेळी घेत होता, असे तपासात आढळून आले आहे. या रॅकेटमध्ये बॅंक कर्मचारी आणि चार्टर्ड अकौंटंटचाही सक्रिय सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
संगच्या ताब्यातून दोन बनावट आधार कार्ड आणि एक बनावट पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. पहिले आधार काड दिल्लीतील तर दुसरे आधार कार्ड मणीपुरच्या पत्त्यावरचे होते. हे दोन्ही चार्ली पेंग या नावाने आहेत. मात्र या 40 वर्षीय चीनी नागरिकाचे खरे नाव लुओ संग असे आहे. तो ल्हासा येथील नागरिक आहे., सध्या तो हरीयाणातील गुडगाव येथे रहात आहे.
भारतीय मुलीशी विवाह
लुओ संगने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी भअरतीय मुलीशी विवाह केला होता. त्याची पत्नी मिझोरामची रहिवाशी आहे. तपास यंत्रणांनी तिचाही पासपोर्ट जप्त केला आहे.