मांडवेत दोन तर वाकेश्वरमध्येही एक रूग्ण
वडूज (प्रतिनिधी) – वडूजमध्ये करोनाची साखळी तुटली असे वाटत असतानाच गेल्या दोन दिवसांत चार जणांना बाधा झाली आहे. यामध्ये पेडगाव रस्त्यावरील एक माध्यमिक शिक्षिका, तिचा मुलगा व शहरातील दोन खत विक्रेत्यांचा समावेश आहे. मांडवे येथे दोन तर वाकेश्वर येथेही एक बाधित आढळला आहे.
वडूजमधील 45 वर्षांची ही शिक्षिका 12 वर्षांच्या मुलाला घेऊन गेल्या आठवड्यात कोरेगाव तालुक्यातील विवाह सोहळ्यास गेली होती. दोन दिवसांपूर्वी किरकोळ त्रास जाणवल्याने ती एका खासगी रुग्णालयात गेली. प्राथमिक लक्षणे जाणून घेऊन तेथील डॉक्टरांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. तिथे तिची तपासणी केली असता करोनाची लक्षणे आढळली. त्याचबरोबर शहरातील दोन खत विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वी अचानक त्रास होऊ लागला. त्यांची तपासणी केली असता, ते बाधित आढळले आहेत. त्यांच्यावर सातारा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ते दोघेही चार महिने कोठेही बाहेर गेले नव्हते. दुकानात थांबूनच खते, बी-बियाणे विक्री करत होते. त्यामुळे त्यांना करोनाची लागण कोठून झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाकेश्वर येथील 27 वर्षीय युवक बाधित झाला असून त्याचा विद्युत मोटारी दुरुस्तीचा व्यवसाय करतो. त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नाही. या युवकास कोठून बाधा झाली, याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
मांडवेत सून व सासरा बाधित
मांडवे येथील 72 वर्षीय पुरुष व त्याची 32 वर्षीय सून बाधित झाली आहे. बाधित वृद्धाचा 45 वर्षांचा मुलगा चार दिवसांपूर्वी टायफॉइडवरील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात गेला होता. त्याच्या करोनाची लक्षणे वाटल्याने डॉक्टरांनी त्यास शासकीय दवाखान्यात जायला सांगितले. आरोग्य विभागाने त्या युवकासह कुटुंबीयांची तपासणी केली. त्यामधे हा युवक निगेटिव्ह आला तर त्याची पत्नी व वडील यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना मायणी येथे करोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख, गटविकास अधिकारी रमेश काळे, सपोनि मालोजीराव देशमुख, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. संतोष मोरे, डॉ. प्रतिभा थोरात, डॉ. प्रतिभा गंबरे आदींनी गावात भेट देऊन ग्रामस्थांना सूचना दिल्या. वाकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नामदेव फडतरे, माजी उपसरपंच अनिल कचरे, सदस्य दत्ता फडतरे, ग्रामसेवक सोमनाथ सावंत, सचिन राऊत, महेश फडतरे, शशिकांत फडतरे उपस्थित होते.