महेश भांबेरे
बेल्हे : अस म्हणतात कि, या जगात आई एवढी माया दुसरं कोणीच करू शकत नाही. आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गोळ्याच संरक्षण करण हे कोणत्या आईला सांगायला लागत नाही. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे भर पावसात कसलीही चिंता न करता घरट्यातील पिल्लांना जपणारी आई.
२ दिवसापूर्वी शेतामध्ये काम असताना नजरेस उसामध्ये असलेले हे घरटे पडले. जवळ जाऊन पाहिले असता त्यात आपल्या आईला बोलावण्याचा प्रयत्न करणारी पिले दिसली. ती खूपच लहान असल्यामुळे त्यांचा आवाजदेखील निघत नव्हता..
हि पिले नेमकी कोणत्या पक्षाची आहेत ते पाहून समजल नाही. त्यामुळे आसपास कोणता पक्षी दिसतो का ते पाहिले. परंतु कोणताच पक्षी आसपास दिसला नाही. बराच वेळ उलटून गेला परंतु त्यांची आई काही आली नाही. नेचर फोटोग्राफीची आवड असल्याने त्या पिल्लांचे फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. पिल्लांची आई नक्की येईल या विचाराने फोटो आणि व्हिडीओ काढून आपल्या पुढील कामाला लागलो.
आज २ दिवसांनंतर सुरु झालेल्या जोरदार पाऊसामुळे त्या घरट्यातील पिल्लांची काळजी वाटू लागली. त्यांना पाहण्यासाठी आज शेतामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर त्याच्या नजरेस जे पडले ते नक्कीच चकित करणारे होते.
आपल्या पिलांना पंखांने झाकून स्वतः मात्र त्या जोरदार पाऊसात भिजणारी पिलांची आई दिसली. स्वतःच्या जीवाची कसलीही परवा न करता ती पावसात त्यांना जपत होती. म्हणूनच म्हणतात ना आई हि आईच असते आणि तिच्या एवढी माया जगात दुसरं कोणीच करू शकत नाही.