शिक्रापूर – शिक्रापूरसह परिसरात करोनाचा फैलाव झापट्याने होत असून गुरुवारी (दि. 6) नऊ जणांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील 4 , कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, सणसवाडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण नऊ जणांना करोनाची लागण झाली आहे. शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील राहणाऱ्या एका युवकाचा करोना अहवाल तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला असताना आरोग्य विभागाच्या वतीने त्याच्या संपर्कातील तिघांची करोना तपासणी केली असता एका महिलेसह दोघे पॉझिटिव्ह तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एक कंपनी कामगाराचा समावेश आहे.
शिक्रापूर परिसरातील करोनाबाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्ण राहत असलेल्या परिसरात जावून ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करीत परिसर निर्जंतुकीकरण केले आहे. सर्व करोनाबाधितांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु केले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.