बीजिंग: टिकटॉक या व्हिडिओ ऍपवर अमेरिकेत बंदी घालण्याचे सूतोवाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेवर चीनने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेतील कंपन्यांच्या बाबतीत अन्य देशांकडूनही अशीच प्रतिक्रिया दिली जाऊ शकते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेन्सबीन यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका असल्याच्या कारणावरून अमेरिकेतील कोणत्याही कंपन्यांवरही इतर देशांकडून बंदी घातली जाऊ शकते, असे ते म्हणाले. अमेरिकेने विनाकारण वाद निर्माण करू नये. नाहीतर त्याचा परिणाम अमेरिकेलाही भोगायला लागू शकतो.
अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांच्या मताचा कौल लक्षात घ्यावा. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या कलदेखील लक्षात घ्यावा आणि आर्थिक गोष्टींचे राजकारण करू नये, असेही वेन्सबीन म्हणाले.
ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत टिकटॉकची खरेदी करायला अमेरिकेतील उद्योगांनी पुढे यावे, ही त्यांची अपेक्षा आहे. जर तसे झाले नाही, तर टिकटॉकवरील बंदीचा निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना प्राप्त विशेष आर्थिक अधिकारांचा अवलंबही ट्रम्प यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने
दिले आहे.
टिकटॉक खरेदी करण्याची तयारी मायक्रोसॉफ्टने दर्शवली आहे. मात्र खरेदीबाबतची चर्चाही 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही.