सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रयत्न
पुणे – सध्या करोनाशी लढण्यासाठी संपूर्ण जगभर विविध प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध उपक्रमांद्वारे पुढाकार घेतला आहे. आता कोविडचे निदान कमी खर्चात व कमी वेळेत करता यावे, याकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करत आहे.
या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एक्स-रे, सिटी स्कॅनद्वारे कोविडचे निदान करण्याऱ्या “दीपटेक मेडिकल इमॅजिंग प्रा. लि.’ या स्टार्टअप कंपनीसोबत पुणे विद्यापीठ जोडले गेले आहे. याबाबत कुलगुरू नितीन करमळकर आणि “दीपटेक मेडिकल इमॅजिंग’चे सहसंस्थापक अजित पाटील यांच्यात करार झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, सेंटर फॉर इनोवेशनच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अरविंद शाळीग्राम, अनिरुद्ध पंत व डॉ. अमित खरात आदी उपस्थित होते.
डॉ. पालकर म्हणाल्या, “या स्टार्टअपद्वारे एक्स-रे, सिटी स्कॅनद्वारे कोविडचे निदान कमी खर्चात व कमी वेळेत करणारे तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कोविडची चाचणी कमी खर्चात, कमी वेळेत होऊ शकेल व जास्तीत जास्त लोकांची चाचणी आपल्याला करता येईल. हे तंत्रज्ञान विद्यापीठामार्फत शहरातील हॉस्पिटल्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. यात जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर राहील.
पुढील एक ते दीड महिन्यांत या तंत्रज्ञानाचा प्रयोग पाच हजार रुग्णांवर करणार आहोत. त्यानंतर या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या तंत्रज्ञानाचा समाजासाठी खूप उपयोग होऊ शकेल.’ त्यासाठी हॉस्पिटल्स आणि त्यांचे अधिष्ठात्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.