पुणे – सन 2047 मध्ये पुण्याची लोकसंख्या एक कोटींच्या वर जाईल, असा अंदाज महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या ही लोकसंख्या 40 लाखांपेक्षा जास्त आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 34 लाख दोन हजार होती.
पुण्याचा वेगाने होणारा विकास, मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता, निर्माण होणारे विविध गृहप्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, मलनिःस्सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्थामुळे पुण्यात स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्राची वाढ त्यातून मिळणारा रोजगार यामुळे शहरीकरणाचे गती वाढली आहे. शहरीकरण आणि सर्वांगीण विकास हे एकमेकांना पूरक असतात.
पुण्यात अनेक शासकीय, खासगी संस्था, नामांकित महाविद्यालये असल्याने चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण घेण्यासाठी इतर राज्यातील तसेच परदेशांतून विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणात येतात. अनेक गावेही समाविष्ट केल्याने उपनगरांचा विकासही वेगाने झाला आहे. काही भागांचा विकास हा नियोजनबद्ध झाला असून, “लिव्हेबल सिटी’ म्हणून पुणे अव्वल क्रमांकावर आहे.