शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना आज पुन्हा शिक्रापुर येथील तळेगाव रोड परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोघांना तसेच कोरेगाव भीमा येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकाच घरातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील तळेगाव ढमढेरे रोड परिसरात राहणारा एक युवक कोरेगाव भीमा येथील कंपनीत नोकरीला असून त्याला काही त्रास जाणवत होता. तर दुसरा मजूर इसम असून त्याला देखील काही त्रास जाणवत असताना दोघे हि शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी गेलेले असताना त्यांच्यामध्ये काही लक्षणे जाणवू लागल्याने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्यावेळी दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरेगाव भीमा येथील एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील घरातील काही व्यक्तींचे स्बॅव आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतलेले असताना त्या पैकी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शिक्रापूर तसेच कोरेगाव भीमा येथील सदर परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केला. शिक्रापूर येथील दोघांच्या संपर्कातील सहा जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच कोरेगाव भीमा येथे नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे.