नगर (प्रतिनिधी) – पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नॅचरोपॅथीचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला. वाफारा सत्याग्रहाच्या माध्यमातून वाफ घेणे व उकडे ग्रीन मोदकचा आग्रह धरण्यात आला. तर या सुचना राज्य सरकारने करोनासाठी नेमलेल्या टास्क फोर्सला पाठविण्यात येणार आहे अशी माहिती कारभारी गवळी यांनी दिली.
यावेळी निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत, ऍड. राजेंद्र सेलोत, अशोक सब्बन, कॉ.महेबुब सय्यद, जालिंदर बोरुडे, बापू चंदनशिवे, शाहीर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते.
वेबीनारद्वारे हेमा सेलोत यांनी नैसर्गिक पध्दतीने करोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाय सांगितले. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी कडीपत्ता, पुदीना, कोबीपत्ता यांची वाफ घेणे व उकडलेले ग्रीन मोदकच्या माध्यमातून पालेभाज्यांचा व औषधी गुणधर्म असलेल्या हिरवा रस पोटात जाण्यासंदर्भात रेसीपी सांगितली.