वाल्हे -येथील मकदमवाडी येथील करोनाबाधित मागील आठवड्यात करोनामुक्त होऊन घरी परतला. त्यावेळी वाल्हे गाव करोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, गुरुवारी (दि. 23) वाल्हे येथील खासगी डॉक्टरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे गुरुवारपासून तीन दिवस वाल्हे गावठाण प्रतिबंधितक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर गावात येणारे रस्ते सील केले आहेत.
गावात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत, करोना दक्षता समिती, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कर्मचारी व शिक्षक आदींच्या मदतीने गावाची तातडीने तपासणी सुरू केल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली. तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी तातडीने भेट देऊन संबंधित सर्व यंत्रणेला मार्गदर्शन करून सूचना केल्या.
यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, सरपंच अमोल खवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सचिन लंबाते, तलाठी निलेश अवसरमोल, हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, मंगेश घोगरे, आरोग्य सेविका धनश्री राऊत, आनंद पवार उपस्थित होते.
पुरंदरमध्ये दिवसभरात 18 बाधित
पुरंदर तालुक्यात करोनाचा कहर सुरूच असून गुरुवारी (दि. 23) करोननाबाधितांच्या संख्येत 18 जणांची वाढ झाली आहे. सासवड शहर 5, जेजुरी 3, कोडीत बुद्रुक 4, सटलवाडी 2, वाल्हे 1, परिंचे 1, गुऱ्होळी 1, सोनोरी 1 अशा 18 बाधित आढळून आली आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत 427 जणांना करोनाची लागण झाली आहे. यत सासवड शहरातील 230 जणांचा समावेश आहे. तर तालुक्यात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे.