‘सिंहगड’च्या संचालकांकडून 40 लाखांची खंडणी

रवींद्र बऱ्हाटे याच्यावर आणखी एक गुन्हा

पुणे – सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीचे संचालक मारुती नवले यांना धमकावून 40 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि साथीदार सिद्धार्थ डांगी याच्यावर डेक्‍कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड संस्थेचे संचालक मारुती निवृत्ती नवले (वय 71, रा. रचना फार्म, एनडीए रस्ता) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. “मुळशीतील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या 11 एकर जागेची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळाकावल्याची तक्रार 2011 मध्ये चैनसुख गांधी यांनी माझ्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सुरू असताना मी माझे म्हणणे आणि आवश्‍यक कागदपत्रे सादर केली. त्यावेळी गांधी यांनी बऱ्हाटे यांच्या सांगण्यावरून माझ्याविरोधात तक्रार दिली होती. बऱ्हाटे या प्रकरणाचा पाठपुरावा करत होता.

मी जिल्हा, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, मला जामीन मिळाला नव्हता. 11 ऑगस्ट 2011 रोजी बऱ्हाटे आणि त्याच्याबरोबर सिद्धार्थ डांगी नावाचा व्यक्ती माझ्या एरंडवणे येथील कार्यालयात आले होते. “मी ठरवले तर तुमचे प्रकरण एका दिवसात बंद होईल. मला पाच कोटी रुपये द्या. माझ्याकडे पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे कुलमुखत्यारपत्र आहे,’ असे बऱ्हाटे याने सांगितले. बऱ्हाटे आणि डांगी पुन्हा माझ्या कार्यालयात आले. त्यांनी माझ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांसह प्राप्तिकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार देईल, अशी धमकी दिली,’ असे नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

“21 सप्टेंबर 2012 रोजी बऱ्हाटे आणि डांगी माझ्या कार्यालयात आले. त्यांनी “त्वरित 50 लाख रुपये द्या,’ असे सांगितले. मी घाबरून रोख 20 लाख रुपये आणि 20 लाखांची सोन्याची बिस्किटे बऱ्हाटेला दिली. इतके दिवस घाबरून मी गप्प होतो. गेल्या पंधरा दिवसात बऱ्हाटेविरोधात कोथरूड तसेच अन्य पोलीस ठाण्यांत फसवणूक, खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याचे समजल्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार देण्याचे ठरवले,’ असे नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड तपास करत आहेत.

अमोल चव्हाण याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात अमोल चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरुड) याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला. या गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा) याचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळला आहे.

या प्रकरणात एका महिलेसह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप, देवेंद्र जैन या तिघांना पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सुधीर वसंत कर्नाटकी (64, रा. राजगड, पौड) यांनी फिर्याद दिली. नोव्हेंबर 2019 ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. यामध्ये चव्हाण याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.