पिंपरी – आमचा पक्ष म्हणून निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आजपर्यंत पक्षासाठी काय केले ते अगोदर सांगावे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपासोबत गद्दारी करून इतरांचे काम करणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशा शब्दात भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर “त्या’ नगरसेविकेने टीका केल्याने भाजपामधील अंतर्गत वाद आणखीनच शिगेला पोहोचला आहे. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वपक्षीयांवरच टीका केली होती. त्या पदाधिकाऱ्याला नगरसेविकेने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याने भाजपातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा बनून रंगत आहेत.
भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करून महापालिकेत मोठे पद मिळविल्यावरून एका नगरसेविकेवर सोशल मीडियातून जोरदार टीका केली होती. गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भाजपातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला होता. आता या वादात संबंधित नगरसेविकेने उडी घेतली असून भाजपाच्या “त्या’ पदाधिकाऱ्यावर सडकून टीका केली आहे. पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या आणि आयाराम गयारामचा वाद निर्माण करणाऱ्या या पदाधिकाऱ्याने लायकीत रहावे, असे संबंधित नगरसेविकेने म्हटले आहे.
पैशांसाठी पक्षाशी गद्दारी
2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसोबत 2019 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणाकडून याने किती पैसे घेतले याचे हिशोब आमच्याकडेही आहेत. पैशांसाठी पक्षासोबत कितीवेळा गद्दारी केली हे आम्हीदेखील जाहीरपणे मांडू शकतो. जे नगरसेवक होऊ शकत नाहीत, पक्षाशी गद्दारी करतात, पक्षवाढीसाठी योगदान देऊ शकत नाहीत, अशांनी टीका करणे हाच प्रकार मूळत: हास्यास्पद आहे. यापुढे आम्हीही टीका सहन करणार नसून जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवल्याचेही या नगरसेविकेने म्हटल्यामुळे भाजपातील कलगीतुरा आणखीनच रंगण्याची शक्यता वाढली आहे.
फोटो व्हिडीओ टाकून महिलांचा अपमान
संबंधित पदाधिकारी हा अर्ध्या चड्डीतील आणि बनियानवरील फोटो आणि व्हिडीओ भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि नगरसेविकांना अनेकदा टाकतो, यावरून काही महिला पदाधिकाऱ्यांच्या घरात भांडणेही झाली आहे. याची पोलखोल करून संबंधित पदाधिकाऱ्याला धडा तर शिकवू तसेच पक्षाच्या व्यासपीठावरही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही या नगरसेविकेने म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील लढाई आता वेगळेच वळण घेण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.