जळोची- कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता उद्या दि. २४ जुलै पासून बारामती शहरातील दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत खुली राहणार आहे. मात्र जो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्या भागात अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बारामती शहरात १६ जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार शहरातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्या शुक्रवार दि. २४ जुलैपासून राज्य आणि केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या सर्वच आस्थापना सुरू करण्यात येणार आहेत.
शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेतच व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातील ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत.