पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन रास्ता पेठेतील महागडी जागा आणि तब्बल 2 कोटींच्या खंडणीची मागणी करून दीड लाख रूपयांची खंडणी उकळल्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
विशाल शिवाजी ढोरे (36), अस्लम मंजूर पठाण (24, दोघेही रा. मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (28, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी त्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणात स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, संबंधित महिला, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश हरिभाऊ जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी केलेली पुर्नविचार याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बर्हाटे (रा. लुल्लानगर चौक, कोंढवा), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाण वाडा पुणे) यांचा शोध सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (64, रा. राजगड, शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार नोव्हेंबर 2019 दरम्यान शिवतीर्थनगर कोथरूड येथे घडला. तिघांनी ब-हाटे याला पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.