लंडन – अवघं जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलं आहे. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या विषाणूची बाधा कोट्यावधी लोकांना झाली असून यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लाखाच्या घरात पोहचली आहे. आता या जीवघेण्या कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कधी एकदा यावरची लस येते याकडेच संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. अशातच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लस निर्मितीमधील शास्त्रज्ञांनी आपल्याला याबाबत ‘दुहेरी’ यश मिळाल्याचा दावा केला आहे.
याबाबतचे वृत्त द डेली टेलिग्राफने लस परीक्षणात सहभागी असलेल्या एका उच्चस्तरीय सूत्राच्या हवाल्याने दिले आहे. या वृत्तानुसार ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्मित केलेली कोरोना लस ‘दुहेरी’ फायद्याची ठरत आहे. लस परीक्षणांअंती प्राप्त झालेल्या निकालांवरून असं दिसतंय की या लसीमुळे शरीरात केवळ प्रतिपिंडेच (अँटीबॉडीज) नव्हे तर टी-सेलची देखील निर्मिती होत आहे.
टी-सेलची निर्मिती होत असल्याने शास्त्रज्ञांना ही लस आणखीनच आशादायी वाटू लागली आहे. यामागचे कारण असे की, प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) व टी-सेल याबाबत झालेल्या स्वतंत्र अभ्यासानुसार शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज या काही महिन्यांसाठीच शरीरात राहतात. तर टी-सेल शरीरामध्ये वर्षानुवर्षे राहू शकतात.
“मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की ऑक्सफर्डची लस ही दुहेरी आघाडीवर काम करते. एकीकडे ती शरीरात अँटीबॉडीज तयार करते तर दुसरीकडे टी-सेलचीही निर्मिती करते. यामुळे लोकांना सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं अशी आशा आहे. आतापर्यंतचे संशोधन अतिशय उत्तम राहील आहे मात्र आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचाय.” अशी माहितीही या उच्चस्तरीय सूत्राने दिली आहे.
असं असलं तरी या सूत्राने, ‘ऑक्सफर्डची लस आशादायक असली तरी या लसीमुळे दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.’ असं देखील सूचित केलं.