शिक्रापूर : फेब्रुवारी – मार्च २०२० बारावीच्या आज ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात शिरूर तालुक्याने शेकडा निकालात सातत्य राखले असून शिरूर तालुक्याचा सरासरी निकाल ९४.५८ टक्के असा लागला आहे.
शिरूर तालुक्यात एकूण ३८ कनिष्ठ महाविद्यालये असून ग्रामीण परिसरात निकालाचा आलेख शहराच्या तुलनेत सरस असल्याचे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यात एकूण ५१६६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४८८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावी परीक्षेत १०० टक्के निकाल लागलेली कनिष्ठ महाविद्यालये पुढीलप्रमाणे :
विद्याधाम प्रशाला शिरूर, सरदार रघुनाथ ढवळे ज्युनि कॉलेज केंदूर, कै. रा. गे. पलांडे आश्रमशाळा मुखई, स्वा. सै. शं. बा. डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे, कालीकामाता विद्यालय वाघाळे, श्री. गुरुदेव दत्त विद्यालय पिंपरखेड, आर. एम. धारीवाल ज्युनि. कॉलेज शिरूर, न्यू. इंग्लिश स्कूल शिरूर, ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरूर, अजिंक्यतारा ज्युनि कॉलेज शिक्रापूर या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
जातेगाव बु ता. शिरूर येथील श्री. संभाजीराजे महाविद्यालयाचा एकूण निकाल ९९ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयाने ग्रामीण परिसरात सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. तर शिक्षकांचे नियोजनबद्ध वार्षिक अभ्यासक्रम नियोजन, तंत्रस्नेही ई क्लास रूम अध्यापन, नीट व जेईई अभ्यासक्रमाचे घटकनिहाय मार्गदर्शन, कला वाणिज्य शाखांसाठी सातत्यपूर्ण चाचणी व निकाल विश्लेषण, सत्र व वार्षिक परिक्षांचे कालबद्ध आयोजन, विषय तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, संस्था नियामक मंडळाचे शालेय नियोजन व प्रेरणा यामुळे हे यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रीया प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे :
वाणिज्य शाखेमध्ये धनश्री शांताराम भरणे हिने ८७ % गुण मिळवीत प्रथम क्रमांक, भाग्यश्री कैलास खळदकर हिने ८०% गुण मिळवीत द्वितीय क्रमांक, वैष्णवी विजय रुके हिने ७८% गुण मिळवीत तृतीय क्रमांक तर कला शाखेत पांडुरंग सुरेश आयवळे याने ७८% गुण मिळवीत प्रथम क्रमांक, महेश शंकर फणसे याने ७५% गुण मिळवीत द्वितीय क्रमांक, पूजा एकनाथ डफळ हिने ७४% गुण मिळवीत तृतीय क्रमांक आणि विज्ञान शाखेमध्ये अनघा चंद्रगुप्त मोरे हिने ८४% गुण मिळवीत प्रथम क्रमांक, पल्लवी किसन तांबे हिने ८३.५३% गुण मिळवीत द्वितीय क्रमांक, प्रणाली मारुती गवारी हिने ८२% गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले असून संस्था मार्गदर्शक व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी भविष्यकालीन वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गुणवत्ता घटण्यामागे प्रमुख कारणे म्हणजे विद्यार्थ्यांना दोन भागांचा पेपर तीन तासात लिहावा लागतो. साहजिकच त्यामुळे मानसिक ताण विद्यार्थ्यांना जाणवतो. सीबीएसई समकक्ष अभ्यासक्रमाची तयारी करताना सातत्यपूर्ण सरावाचा अभाव जाणवतो. दहावीनंतर भाषा माध्यम बदलाचे दडपण येउन बारावी वर्गात गुणवत्ता घटीत होते.’
प्राचार्य रामदास थिटे – सचिव शिरूर तालुका मुख्याध्यापक सघ.