चंदीगड – मंत्रालयातील एका कोरोनाबाधित सहकाऱ्याच्या संपर्कात आल्याने काल पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचं समोर आलंय.
मंगळवारी (काल) पंजाबचे ग्रामीण विकास मंत्री त्रिपत राजिंदरसिंग बाजवा यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री सिंग यांनी मंत्रालयातील सर्व मंत्री, विभागांचे सचिव व आमदारांना आपली कोरोना चाचणी करून घेण्याबाबत सांगितले होते.
आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कोरोना बाधित आयएएस/पीसीएस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या मंत्री व अधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाजवा यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. सोबतच सर्व अधिकारी व मंत्र्यांनी इतरांच्या संपर्कात येताना काळजी घ्यावी असंही सांगितलं.
अमरिंदर सिंग यांनी राज्यातील जनतेला देखील कोरोना लक्षणे दिसल्याबरोबर चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं असून कोरोना बाधा वेळेत लक्षात आल्यास त्यावर परिणामकारक उपचार करता येतात असं सांगितलं.