मेडद येथे बारामती तालुका पोलिसांची कारवाई
जळोची (वार्ताहर) – बारामती तालुक्यातील मेडद गावात हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून बारामती तालुका पोलिसांनी तब्बल 2 लाख 20 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बाळू बगाडे, महादेव सुरेश बागाव (दोघे. रा. मेडद, ता. बारामती) यांच्यासह कच्चामाल पुरवणाऱ्या किराणा दुकानदारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडद गावालगत वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या झाडाझुडपात गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी ही कारवाई केली. कारवाईत गावठी दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे, आप्पा दराडे, वैभव साळवे, रमेश केकान, गणेश काटकर, राहुल लाळगे, जयश्री गवळी, लता हिंगणे व श्रीकांत गोसावी यांनी केली आहे.