पुणे – शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यास खासदार गिरीश बापट आणि शहर रिपाइंने तात्विक विरोध दर्शवला आहे. “हा एकतर्फी निर्णय असून, लोकप्रतिनिधींना यामध्ये विश्वासात घेतले नाही. एकदम लॉकडाऊन जाहीर केले, त्यामुळे आश्चर्याचा धक्काच बसला,’ अशी प्रतिक्रिया खासदार बापटांनी दिली आहे. प्रतिक्रियेचा व्हिडिओ बापट यांनी प्रसारित केला आहे.
“आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत. मात्र, पालकमंत्री हे सत्ताधारी आणि सर्वेसर्वा आहेत. जे मनात येईल ते करू शकतात. त्यांना कोणाशी चर्चा करायची गरज वाटत नाही. ते केवळ अधिकाऱ्यांना विचारून निर्णय घेतात,’ अशी टीका बापट यांनी केली आहे.
करोना बाधितांची संख्या वाढत आहे, म्हणून निर्णय घेतला आहे असे वाटत आहे. मात्र, टेस्टिंग जास्त होत असल्याने ती संख्या जास्त दिसत आहे. उलट याचा फायदा आहे यामुळे फैलाव थांबत आहे. पण, दुसऱ्या बाजूला गेल्या चार महिन्यांपासून हातावर पोट असलेले लोक त्रस्त आहेत. त्यातून पुन्हा बंद म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. 94 टक्के लोकांवर हा अन्याय आहे. जे नियम पाळतात त्यांना दंड का, त्यापेक्षा जे पाळत नाहीत त्यांना शिक्षा करा, अशी मागणी बापट यांनी केली.
आता नव्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान होणार आहे. करोनाच्या उपाययोजनांचे अपयश झाकण्यासाठी ही घोषणा सरकारने केली आहे. यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेला खीळ बसणार आहे; व्यापाऱ्यांमध्येही विरोधाची भावना आहे. मध्यमवर्गीय आणि दुर्बल घटकांची परवड होणार आहे. करोनाला रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. पण, यात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. परंतु प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची पक्षाची भूमिका आहे.
– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
रिपाइंने पोलिसांना दिले पत्र
“आधीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक दुर्बल घटकाचे मोठे हाल झाले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती परिसर कंटेन्मेंटमध्ये असल्याने ते पूर्वपदावर आले नाही. त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास त्यांना उपाशीच राहावे लागेल. त्यामुळे या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. गरजूंना महिनाभर पुरेल एवढे आर्थिक नियोजन सरकारने करावे. नंतर लॉकडाऊन घोषित करावा,’ अशी मागणी रिपाइंने केली आहे.