महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयातील संतापजनक प्रकार
पुणे – महापालिकेच्या भवानी पेठ येथील सोनवणे हॉस्पिटलमध्ये करोना संशयित गर्भवती महिलांना सकाळी देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळ्या निघाल्या. मागील आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून या घटनेनंतर अनेक महिलांनी या जेवणावर बहिष्कार घातला. तसेच, काही महिलांना उलटी तसेच इतरही त्रास झाला.
महापालिकेकडून या रुग्णालयात करोना बाधित गर्भवती महिला तसेच करोना संशयित गर्भवतींना उपचार दिले जातात. या महिलांना दोन वेळेस नाष्टा तसेच जेवण दिले जाते. शनिवारी सकाळी या महिलांना देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळ्या निघाल्या, त्यातील काही महिलांनी रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यानंतर जास्त काही नाही तुम्हाला दुसरा नाष्टा देतो, असे सांगत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही गर्भवती महिलांनी वारंवार हा प्रकार घडत असून यामुळे आम्हाला त्रास होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक महिलांनी या अल्पोपहारावर बहिष्कार टाकला. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच गर्भवती महिलाबाबत असा निष्काळजीपणा केल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
नातेवाईकांची तक्रार…
या पूर्वीही एकदा अशाच प्रकारे जेवणात आळ्या सापडल्या होत्या. त्यावेळी आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावेळी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावेळीही असाच प्रकार आमच्या रुग्णांसोबत घडला आहे. आमचा रुग्ण विलगीकरणात ठेवलेला असून त्या गर्भवती महिला आहेत, अशा अन्नामुळे त्यांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? याबाबत रुग्नांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देतात, तसेच दुसरे नाष्टा देऊ असे सांगत वेळ मारून नेतात.