मुंबई: मुंबईत करोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सुमारे पंधरा लाख लोकांना क्वारंटाईन करावे लागले आहे. असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यातील 5 लाख 34 हजार लोक हाय रिस्क भागातील होते. या क्वारंटाईन करण्यात आलेल्या एकूण पंधरा लाख लोकांपैकी 13 लाख 28 हजार लोकांचा चौदा दिवसांचा निर्धारीत कालावधी पुर्ण झाला आहे.
आज 2 लाख 46 हजार लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर 14 हजार 288 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईत कोविड केअर सेंटर्स (सीसीसी 1) मध्ये 50 हजार बेड्स उपलब्ध करून देण्यात आले असून सीसीसी-2 फॅसिलिटी मध्ये 6100 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मुंबईतील हॉटेल्स, हॉल अशा ठिकाणी सीसीसी -1 फॅसिलिटी उपलब्ध असून तेथे 24 तास मॉनेटरिंग सुविधा उपलब्ध आहे तर सीसीसी-2 मध्ये चोवीस तास डॉक्टर्स व नर्सेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटर्स साठी शहरातील अनेक हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, जिमखाने, हॉल्स आणि अन्य ठिकाणे ताब्यात घेतली आहेत.