अतिरिक्त आयुक्तांसह बहुतांश अधिकारी क्वारंटाइन
पुणे – महापौरांसह त्यांच्या संपर्कातील 20 जण करोनाबाधित सापडल्यानंतर महापालिका भवनात सर्वांचेच धाबे दणाणले आहे. त्याचा परिणाम सोमवारी महापालिकेतील कामकाजावर दिसला. महापालिका भवनात अक्षरश: शुकशुकाट पहायला मिळाला.
महापौरांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या बैठकीला जे अधिकारी होते, त्या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. परंतु, या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याशिवाय महापालिकेत जाणे आता टाळा, असा संदेशच एकप्रकारे पोहोचल्याने महापालिका भवनात दिवसभर शुकशुकाट होता. याशिवाय महापालिका भवनाच्या मुख्य द्वारावरूनच महत्त्वाच्या कामाशिवाय आत जाण्याला मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे तशीही कामासाठी येणाऱ्या मंडळींव्यतिरिक्त अन्य लोकांची रेलचेल एकूणच येथे कमी झाली आहे.
नेत्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज असतेच. परंतु, नेते मंडळींनीच म्हणजे सदस्यच आता महापालिका भवनात येण्याची धास्ती घेतल्याने त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही आपोआप कमी झाली आहे. मुळातच करोनाच्या भितीने नेत्यांनी आपल्यामागील कार्यकर्त्यांची फौजही कमीच केली आहे.