करोनाचे संक्रमण वाढल्याने साताऱ्यात भीतीचे वातावरण
सदरबझार, राधिका रस्ता, मोळाचा ओढा येथे कंटेन्मेंट झोन
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरातही करोना हातपाय पसरायला लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात रविवारी तीन तर उपनगरात एक, असे चार जण करोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. राधिका रोड, सदरबझार व मोळाचा ओढा येथे संबधित ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित करण्यात आले आहे.
बाधित सापडलेल्या ठिकाणी शंभर मीटर परिसरात अग्निशमन दलाने जंतुनाशकाची फवारणी केली. पालिकेत महिला अधिकारी करोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागाच्या प्रमुखासह नऊ जण क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे सतीश साखरे, अतुल दिसले, शैलेश अष्टेकर यांच्या राखीव पथकावर शहराच्या आरोग्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शाहूनगर येथे 38 वर्षांची महिला, सदरबझार येथील कपिला पार्कमधील 40 वर्षांची महिला, मोळाचा ओढा परिसरातील 23 वर्षांचा युवक हे कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर राधिका रस्त्यावरील एका इमारतीत राहणारा व एका एका चॅनेलचा प्रतिनिधी असलेला 30 वर्षांचा युवकदेखील करोनाबाधित झाल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची चिंता वाढली आहे.
अग्निशमन दलाने या ठिकाणी जंतुनाशकाची केली तर सतीश साखरे यांनी घंटागाड्यांची व्यवस्था करून या भागांमध्ये स्वच्छता करून घेतली. त्यासाठी 40 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शाहूनगरमधील महिला जिहे येथील रुग्णाच्या संपर्कात होती. राधिका रोडवरील युवक साताऱ्यातील बाधिताच्या निकट सहवासात आला होता. मोळाचा ओढा येथील 23 वर्षांचा पुरुष मुंबईतून आला आहे. बाधित सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवार पेठेतील आडत व्यापाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात अनेक जण आले होते. त्यामुळे राधिका रोडवरील अनेक इमारतींमधील नागरिक चिंताग्रस्त आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून उद्या, दि. 6 रोजी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.