डोर्लेवाडी – बारामती तालुक्यात अवैध धंदे पुन्हा बोकळले असून पोलीस त्यामानाने कारवाई करीत नसल्यामुळे यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, पिंपळी, गुणवडी, काटेवाडी, बारामती शहर, मळद, मेदड, शिर्सुफळ, सुपे, माळेगाव, सांगवी, शिरसषणे, गोजुबावी, लाटे, सोमेश्वर, कऱ्हावागज, तांदुळवाडी, माळेगाव, माळेगाव कारखाना परिसर, पणदरे, वडगाव, कोऱ्हाळे बुद्रुक, ढाकाळे, मुढाळे, अंजनगाव, पारवडी, ढेकळवाडी या गावात राजरोजपणे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नांव न छापण्याच्या अटीवर एका पोलिसाने सांगितली आहेत.
यात तालुक्यातील डोर्लेवाडी आणि कण्हेरी गाव अपवाद आहे, ही गावे तेथील नागरिक आणि पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे 2008 पासून दारूमुक्त झाली आहेत. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विकली जाते त्यामध्ये हातभट्टी, लिकर, केमिकल युक्त ताडी, मटका, जुगार राजरोजपणे सुरू आहेत. मात्र, पोलीस तात्पुरती कारवाई छोट्या-मोठ्या विक्रत्यावर कारवाई करण्यात धन्यता मानता. पण बड्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यात दारूमुळे अनेकांचा बळी गेला आहे तर अनेक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र, याचे कोणालाच सोयरसुतक राहिले नाही. तर हातावर पोट असणारे वर्षानुवर्षे भरडले जात आहेत.
आदेशाला वारंवार केराची टोपली
अवैध धंदे बंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत पोलिसांना अनेकवेळा दिले आहेत; मात्र त्याच्या आदेशाला पोलिसांकडून वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे बारामती तालुका दारूमुक्त कसा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आम्हाला माहिती मिळताच त्या ठिकाणी कारवाई केली जाते. तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून संबंधित ठिकाणाचे नाव सांगवे आम्ही तात्काळ कारवाई करू.
– अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक