नगर(प्रतिनिधी) – आरोग्य विभागासह अग्निशमन विभागातील तीन अधिकारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. महापालिका आरोग्य विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या घरात गेल्या एक ते दोन वर्षांपासून हे अधिकारी बळजबरी मद्यपान करत असल्याची तक्रार संबंधित महिलेच्या अल्पवयीन मुलाने केली आहे.
अधिकाऱ्यांकडून कधी दिवसा तर बहुतांशवेळा रात्री उशिरा घरात मद्यपान सुरु असते. त्याचा त्रास असह्य झाल्याने संबंधित अल्पवयीन मुलाने या अधिकाऱ्यांना घरात येऊन मद्यप्राशन करण्यास विरोध केला. त्याचा राग आल्याने त्या अधिकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे या तक्रार अर्जामध्ये संबंधित मुलाने म्हटले आहे.
रात्री उशिरा दारू पिऊन हे अधिकारी घरात धिंगाणा घालतात, त्याचाही खूप त्रास होतो, म्हणून विरोध केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मला घराच्या गच्चीवरुन फेकून देण्याचाही प्रयत्न केला. त्यातून मी बचावलो. मात्र, या अधिकाऱ्यांकडून माझ्या जीविताला धोका आहे. ते पुन्हा केव्हाही माझ्या घरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे त्यांची तातडीने चौकशी करुन त्यांना अटक करावी, अशी विनंती संबंधित अल्पवयीन मुलाने अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे. दरम्यान, आज दुपारी संबंधित तक्रारीवरुन पोलीस पथकाने तिघांनाही चौकशीसाठी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले होते. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.