नगर मनपाला स्वच्छतेचे थ्री स्टार मानांकन

नगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले असून, या गुणवत्ता यादीत आपला समावेश झाला आहे. 1 हजार 500 गुणांपैकी आपल्याला एक हजार गुण मिळाले असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर शहरात केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, कचरामुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला होता. शहरातील कचरा कुंड्याही हटविण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेला गती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. शहर स्वच्छ व्हावे, यासाठी ते स्वत: मैदानात उतरले होते. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर, स्वच्छता निरीक्षक, नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचारी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली असून, नगरकरांच्या प्रयत्नांना यश आले असून, 1 हजार 500 पैकी एक हजार गुण मिळाले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे अधिकारी व खासकरुन सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. महापालिकेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, शहरातील स्वयंसेवी संस्थांचाही त्यात मोलाचा वाटा आहे. माझ्या महापौरपदाच्या कारकिर्दीत हे यश मिळाल्याचा विशेष आनंद आहे. सरकारकडून नगरला आता 11 ते 25 कोटी रुपयांपर्यंत खास निधी मिळू शकेल. त्या अपेक्षित निधीचाही उपयोग शहराची स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठीच करू.
बाबासाहेब वाकळे, महापौर

स्वच्छता अभियानात नगरकरांनी दिलेली साथ खूप मोलाची ठरली. आता देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नगरचा समावेश होईल, या स्वप्नपूर्तीसाठी नगरकरांनी अशीच साथ कायम ठेवावी. यात महानगरपालिकेचे अधिकारी व खास करुन सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान खूप मोठे आहे. स्वच्छतेचे महत्त्व कायम राखल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल. अशीच स्वच्छता कायम ठेवल्यास नगरमध्ये साथीचे आजार देखील वाढणार नाहीत.
संग्राम जगताप,आमदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.