गेल्या तीन दिवसांत नऊ जणांनी संपवली जीवनयात्रा
पुणे – पुणे शहरात मागील तीन दिवसांतील तब्बल 9 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सुखसागरनगर येथे एका दाम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांना फासावर लटकवत स्वत: आत्महत्या केली होती. तर त्याच दिवशी धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने आत्महत्या केली. तर, रविवारी सकाळी एका नेपाळी दाम्पत्याने आपले आयुष्य संपवले आहे. सहकारनगर येथे एका तरुणाने गळफास घेत आणि वारजे येथे एका महिलेने टेकडीवरून उडी मारत जीव दिला आहे. यामागे केवळ आर्थिक विवंचनेचे कारण आहे, की अन्य कोणते? याची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे.
नेपाळी दाम्पत्याने संपवले जीवन
रास्ता पेठेत राहणाऱ्या नेपाळी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. पतीने गळफास घेतल्यानंतर पत्नीनेही गळफास घेऊन जीवन संपवले. संबंधित व्यक्ती एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सूरज सोनी (27, रा. पदमजी पार्क, विश्राम सोसायटी, रास्ता पेठ), करिना सोनी ( 22) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. यासंदर्भात माहिती देताना समर्थ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पलांडे म्हणाले, “सूरज हा चार महिन्यांपूर्वीच संबंधित सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. तेथेच एका खोलीत पत्नी आणि मेहुण्यासोबत राहत होता. सकाळी नऊच्या सुमारास सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांना दोघेही एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
पतीचा मृत्यू पाहून तिनेही घेतला फास
सूरज आणि करिना यांच्या विवाहाला वर्ष झाले होते. विवाहानंतर त्यांचे सतत वाद होत होते. शनिवारी रात्री सूरज आतल्या खोलीत एकटाच होता. तर, पत्नी आणि तिचा भाऊ खोलीबाहेर होते. तिच्या भावाने सकाळी दरवाजा ठोठावला, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, सूरजने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने सूरजच्या भावाला माहिती देण्यासाठी पूलगेट येथे धाव घेतली. तेथून येईपर्यंत करिनानेही गळफास घेतल्याचे आढळले.
टेकडीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या
चांदणी चौकातील डुक्कर खिंडीत एका महिलेने उडी मारून आत्महत्या केली. अंदाजे दीडशे फुटांवरून तिने उडी मारली. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे असून तिने अंगावर काळा ब्लाऊज व काळी-पांढरी फुलांची साडी परिधान केलेली आहे. तिच्या उजव्या हातावर मोराचे गोंदण असून डाव्या हातावर एस.ए. असे अक्षर गोंदलेले आहे. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.
तरुणाने आत्याच्या घरी जाऊन घेतला गळफास
तरुणाने आत्याच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पद्मावती येथील मल्हार मार्तंड सोसायटीत घडली. तरुणाने सुसाइड नोट ठेवली नव्हती. यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. शुभम राजेंद्र बोबडे (23, रा. नवजीवन सोसायटी) असे या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे म्हणाले, “सुभाष शनिवारी दुपारी आत्याच्या घरी आला होता. थोड्यावेळाने तो वरच्या खोलीत एकटाच गेला. तेथे त्याने गळफास घेतला. त्याचा आतेभाऊ वरच्या खोलीत आला असता, त्याला शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने शुभमला खाली उतरवून पोलिसांना याची माहिती दिली. त्याच्या घरच्यांनी आत्महत्येसंदर्भात कोणतेही कारण सांगितले नाही. त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीही ठीक होती. तो थोडाफार तणावात होता. मात्र, त्यामुळे तो आत्महत्या करेल अशी शक्यता नसल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शुभमचा तुळशीबागेत चपलांचा स्टॉल होता. लॉकडाऊनमुळे तो मागील काही महिने बंद होता. मात्र, आता तरी तेथे ग्राहकांची म्हणावी तशी गर्दी नाही. यामुळे आत्महत्या करण्यामागे आर्थिक कारण आहे का, हे तपासले जात आहे.