वॉशिंग्टन – भारत आणि चीन यांच्या सीमेवर सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आमचे प्रशासन दोन्ही देशांशी संपर्क साधून असून त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की ही खरोखरच खूप अवघड स्थिती आहे. आम्ही त्या विषयी दोन्ही देशांशी बोलत आहोत. दोन्ही सैन्य एकमेकाशी भिडले आहे. तेथे नेमके काय झाले याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत असे ट्रम्प यांनी आज पत्रकारांशीा बोलताना सांगितले.
अनेक देश सध्या करोना विरोधातील लढाईत गुंतलेले असताना त्याचा गैरफायदा घेऊन चीन आपल्या शेजारील देशांशी तणाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीननेच सीमा भागात आक्रमक भूमिका घेऊन हा तणाव वाढवला असल्याची टीका अमेरिकेच्या प्रशासनाने या आधीच केली आहे.
चीन आक्रस्ताळा देश आहे अशी टीक अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही जाहीरपणे केली आहे. भारत आणि चीन सीमेवरील घडामोडीवर अमेरिका लक्ष ठेऊन आहे अशी प्रतिक्रीया व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली आहे.