शिक्रापूर, (वार्ताहर)- येथील माजी चेअरमन तथा माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली.
रमेश थोरात हे सकाळच्या सुमारास काळोखेवस्ती येथील विहिरीचे पाणी पाहून येतो, असे म्हणून घरातून कारने (एमएच 12 एमयू 0052) गेले. काही वेळाने विहिरीच्या कडेला थोरात यांची कार व बाजूला चपला पडलेल्या दिसल्याने शेजारील नागरिकांनी विहिरीत पाहिले.
त्यांना विहिरीमध्ये रमेश थोरात तरंगत असल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, आत्माराम तळोले, मंगेश लांडगे, कृष्णा व्यवहारे, अतुल पखाले यांसह अनेक नागरिकांनी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने थोरात यांना बाहेर काढत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले.
मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत रुपेश चंद्रकांत थोरात (वय 36, रा. इकोग्राम सोसायटी शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.