नवी दिल्ली – वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्याचा खगोलप्रेमींच्या उत्साहाला ढगाळ हवामामुळे ग्रहण लागले. राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येच कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू शकले. तर देशाच्या उर्वरित भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. खंडग्रास सूर्यग्रहणाची सुरुवात सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी झाली आणि दुपारी 3 वाजून 4 सेकंदांनी ग्रहण सुटले.
ज्या भागांमध्ये कंकणाकृती किंवा खंडग्रास सूर्यग्रहण दिसण्याची अपेक्षा होती, तेथे ढगाळ हवामानामुळे स्पष्ट सूर्यदर्शन होऊ शकले नाही. खगोल विज्ञानप्रेमींनी उत्सुकतेपोटी ठिकठिकाणी सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी व्यवस्था केलेली होती. मात्र त्यांची निराशाच झाली. हवामानाबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे बंधन असल्यामुळे या सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी खगोलप्रेमींना गर्दी करता आली नाही.
देशातील अन्य विज्ञान संस्थांप्रमाणेच गुजरात कौन्सिल ऑन सायन्स ऍन्ड टेक्नोलॉजीने देखील फार मोठी निरीक्षण व्यवस्था केलेली नव्हती. गांधीनगरच्या कार्यालयात टेलिस्कोप, पिनहोल कॅमेरे आणि सोलर फिल्टर्सबसवून विद्यार्थ्यांसाठी मर्यादित सोय केली गेली होती. मात्र काही उत्साही खगोलप्रेमींनी आपापल्या घरांच्या गच्चीवर आणि उघड्या मैदानातून एक्स रे फिल्म, काळे चष्मे लावून ग्रहण पहण्याचा प्रयत्न केला.
उत्तराखंड, बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथील मंदिरे काल रात्री 10.3 वाजल्यापासूनच बंद ठेवली गेली होती. आज दुपारी 2.30 नंतर ही मंदिरे उघडली गेली. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे ब्रह्म सरोवराच्या किनारी ग्रहणकाळात धार्मिक स्त्रोत्रांचे पाठ केले गेले.
नेहमी ग्रहणकाळानंतर या सरोवरात अंघोळ करण्यासाठी लाखो भाविक जमा होतात. मात्र यावेळी ही प्रथा अनुसरली गेली नाही. कुरुक्षेत्रा व्यतिरिक्त ग्रहण मार्गावरील देहरादून, चमोली, जोशीमठ, सिरसा आणि सूरतगड अशा काही शहरांमध्ये हवामान चांगले असल्यामुळे ग्रहणाचे निरीक्षण केले जाऊ शकले.
भारताबाहेर कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान आणि चीनमधूनही ग्रहणाचा मार्ग गेल्याने तेथूनही कंकणाकृती ग्रहण दिसू शकले. यापुढील सूर्यग्रहण 2022 मध्ये डिसेंबरमध्ये दक्षिण अमेरिकेतून बघितले जाऊ शकणार आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.