रुपयाचे मूल्य स्थिर राहण्यास मदत
मुंबई – जून 12 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय गंगाजळी 507 अब्ज डॉलरवर गेली आहे. यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या गंगाजळीत साधारणपणे 6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनसाठा 500 अब्ज डॉलरच्या पुढे प्रथमच गेला होता. या कालावधीत भारतातील बऱ्याच कंपन्यांत थेट परकीय गुंतवणूक वाढली आहे. त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समावेश आहे. त्याचबरोबर शेअरबाजारातही परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत.
पतमानांकन संस्थांनी भारताचे भविष्य फारसे सकारात्मक नसल्याचे म्हटले असले तरी परकीय गुंतवणूकदार मात्र भारताबाबत आशावादी असल्याचे चित्र या आकडेवारीतून दिसून येते.
परकीय चलनसाठा जास्त असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर सध्याच्या अस्थिर परिस्थितीत फारसा परिणाम झालेला नाही. भारताने या साठ्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर भारताला चलन पातळीवर अस्थिरतेचा सामना करावा लागणार नाही, असे याबाबत बोलताना विश्लेषकांनी नमूद केले.