रोम – जागतिक फुटबॉलमधील अव्वल खेळाडू व युव्हेंट्सचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे आव्हान लिलया मोडून काढताना नापोली संघाने इटालियन करंडक फुटबॉल स्पर्धेचे सहावे विजेतेपद साकार केले.
अंतिम सामन्यात रोनाल्डोवर नियंत्रण ठेवत नापोलीच्या संघाने त्याला गोल करण्याची एकही संधीच मिळू दिली नाही. हा सामना नापोलीने पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 असा जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पूर्ण वेळात नापोलीने सामना गोलशून्य बरोबरीत सोडवला होता. पेनल्टी शुटआऊटमध्ये युव्हेंट्सकडून लिओनार्डो बोनुक्की आणि आरोन रामसे यांनी गोल केले. त्याला चोख उत्तर देताना नापोलीकडून लॉरेंस इनसइन, मॅटेओ पॉलिटानो, निकोला मॅक्सीमोव्हिक आणि अर्कादिस्ज मिल्क यांनी गोल केले व संघाचा विजय साकार केला.
आरोग्य संघटनेची टीका….
नापोली संघाने विजेतेपद मिळविल्यानंतर जल्लोष केला होता. यावेळी करोनाबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले नाही, असे व्यक्त करत इटलीच्या आरोग्य संघटनेने नापोली संघाच्या खेळाडूंवर, सपोर्ट स्टाफवर टीका केली आहे.