मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला आहे. काही ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकार मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असताना आता सुशांतने ही आत्महत्या बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळूनच केल्याचा थेट आरोप होतो आहे. त्यातच या घराणेशाहीमागे सलमान खान आणि करण जोहर हेच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एक ऑनलाईन पिटिशनदेखील या दोघांविरोधात सुरु करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे लाखो लोकांनी सलमान खान आणि करण जोहरला धडा शिकवण्यासाठी त्यावर नोंदणी केली आहे.
ही पिटिशन जयश्री शर्मा श्रीकांत नावाच्या एका फेसबुक युझरने सुरु केली आहे. ही ऑनलाईन पिटिशन सुशांत सिंह राजपुतला न्याय मिळावा. सलमान आणि करण विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी व त्यांच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा यासाठी सुरु करण्यात आली आहे.