बारामती -गुणवडी (ता. बारामती) येथील मागासवर्गीय मुलांकरता शासकीय वसतिगृह बांधण्यासाठी 11.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह निर्माण होणार आहे.
वसतिगृहाच्या इमरतीकरिता गुणवडी येथील गट क्र. 660 मधील क्षेत्र 1 हे 28 आरपैकी 0 हे 55 आर जागा प्रस्तावित आहे. ही जागा सामाजिक न्याय विभागाकडे दि. 16 जानेवारी 2013 रोजी हस्तांतरण करण्यात आली आहे. या कामासाठी 11.34 कोटींची 18 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमुख्यवास्तुशात्रज्ञ यांच्याकडून मिळालेल्या आराखड्यानुसार याबाबतचे अंदाजपत्रक करण्यात आले. तर कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रान्वये समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे 11.34 कोटीची मागणी करण्यात आली होती. दि. 26 मे रोजी निधीचा धनादेश प्राप्त झाल आहे.
नवीन इमारत ही नाविन्यपूर्ण व सर्व सोयी-सुविधा युक्त असण्यासाठी, व इमारतीचा आराखडा नवीन असावा यासाठी खासगी वास्तुशास्त्रज्ञामार्फत निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेमध्ये शेवटी एकाची इमारतीच्या आराखड्यानुसार निवड करण्यात आली आहे. त्याला काम सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे बारामतीचे उपअभियंता विश्वास ओहोळ यांनी सांगितले.
100 मुलांसाठी हे वस्तीगृह बांधण्यात येणार आहे. वसतिगृह इमारतीमध्ये सर्व सोई – सुविधा युक्त स्वतंत्र लायब्ररी, व्यायाम शाळा, इंडोर खेळांकरिता व्यवस्था, स्वतंत्र डायनींग हॉल, गृहपाल यांच्या करिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
– विश्वास ओहोळ,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग