नवी दिल्ली – यूरोपातील 11 देशांमध्ये लॉकडाऊन आणि इतर उपायांमुळे करोना संसर्गाच्या प्रसाराला थोपवण्यात आले आहे. लंडनमध्ये केलेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. 11 देशांमध्ये लॉकडाऊन 99.9 टक्के यशस्वी झालेला आहे. बेल्जियम, जर्मनी, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटेन, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि नॉर्वे या 11 यूरोपीयन देशांमध्ये येथील लोकसंख्येच्या 3.2 ते 4 टक्के लोक करोना बाधित झाले आहे. मात्र, मार्चअखेर या देशांमध्ये कडक लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले. यात शाळा, धार्मिक स्थळे बंद, सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासारख्या उपाययोजनांचा अवलंब केला गेला. यामुळे या देशांना फायदा झाल्याचे समोर आले आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. या देशांनी करोना रिप्रॉडक्शन रेट ला एक टक्का खाली आणले आहे. याचा अर्थ असा आहे की, या साथीला आटोक्यात आणण्यात आणि करोना बाधितांच्या वाढत्या संख्येत घट करण्यात हे देश यशस्वी झाले आहेत.
बेल्जियम सारख्या देशात करोना बाधित रेट सर्वात जास्त 3.8 इतका होता. येथे ही साथ धोकादायक पातळी पार करू शकत होती. एवढेच नव्हे तर 31 लाख लोकांचा मृत्यूही झाला असता. मात्र, लॉकडाऊनमुळे बेल्जियमने करोनाच्या विळख्यातून सुटका केल्याचे दिसते आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने केलेल्या संशोधनात चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, इटली, इरान आणि फ्रान्स या सहा देशांमध्ये लॉकडाऊनसह 1 हजार 717 उपायांचे विश्लेषण करण्यात आले. यात असे आढळून आले की, जर लॉकडाऊन आणि इतर उपाययोजना केल्या नसत्या तर चीनमध्ये करोनाचा प्रकोप 465 पटीने, इटलीमध्ये 17 पटीने आणि अमेरिकेत 14 पटीने वाढला असता.