पुणे – करोनाबाधित असलेल्या मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या शहरातील उच्च उत्पन्न गटातील काही रुग्णांकडून खासगी रुग्णालया ऐवजी शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये विलगीकरणाची सुविधा देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी येणारा सर्व खर्च देण्यास रुग्ण तयार आहेत. मात्र, त्यास महापालिकेकडून नकार देण्यात आला असून सर्वांना शासकीय अथवा खासगी रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने या रुग्णांना केल्या आहेत.
देशभरात 1 जूननंतर लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. तसेच परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे मातरम मिशन अंतर्गत भारतात परत आणले जात आहे. मात्र, परदेशातून आलेल्या या नागरिकांना 8 दिवस विलग ठेवण्यात येत आहे. त्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांची सोय महापालिकेकडून शहरातील 3 स्टार आणि 5 स्टार दर्जा असलेल्या 8 हॉटेल मध्ये केली असून त्या ठिकाणी सुमारे 800 जण आहेत. त्याच धर्तीवर आम्हाला लक्षणे नाहीत, त्यामुळे हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्याची मागणी शहरातील काही उच्च उत्पन्न गटातील करोनाबाधित रुग्णांकडून होत आहे.
परदेशातून आलेल्या भारतीयांनाच हॉटेलमध्ये विलग करण्यात आले आहे. या व्यक्ती विमानतळावर आल्यावरच त्यांची कसून तपासणी केली जाते. त्यांना लक्षणे दिसल्यास हॉटेलमध्ये न ठेवता रुग्णालयात थेट उपचारसाठी पाठविले जाते. हॉटेलमध्ये केवळ विलगीकरण आहे. बाधित व्यक्ती नाहीत.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त