पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आपण आपल्या शाहीर मंडळी, व्याख्याते, अभ्यासकांकडून अनेकदा ऐकतो. मात्र, एका फ्रेंच पत्रकाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, फ्रेंच शोध पत्रकार फ्रंकाईस गॉटिअर यांच्या व्याख्यानाचे.
विश्व मराठी परिषद आणि अमेरिकेतील “शिवाजी महाराज अमेरिका परिवार’ या संस्थातर्फे गॉटिअर यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 जून रोजी रात्री 10 वाजता हे व्याख्यान होणार असून, यामध्ये गॉटिअर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच “नेपोलियन बोनापार्ट आणि शिवाजी महाराज यांच्यातील साम्य’ या विषयावर भाष्य करणार आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. सुमारे 48 देशांमधील नागरिक यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती परिषदेचे क्षीतिज पाटुकले यांनी दिले आहे.
गॉटिअर हे फ्रान्समधील पॅरिस या शहरात राहणारे आहे. अनेक वर्षे त्यांनी फ्रान्समधील लुझिगारो या अग्रगण्य वृत्तपत्रात शोध पत्रकारिता केली आहे. भारतात आल्यावर त्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी सखोल अभ्यास सुरू केला. त्यांच्या अभ्यासातून त्यांना उलगडलेले शिवाजी महाराज ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत.