नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गॅंगस्टर अरुण गवळी याच्या पॅरोलच्या मुदतीत पाच दिवसांची वाढ केली आहे. त्याला पॅरोलची मुदत संपल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्यासाठी पोलिसांनी त्याला वाहन परवाना द्यावा असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
हायकोर्टाने मागच्या आठवड्यात दिलेल्या आदेशानुसार गवळी याने नव्या मुंबईतील तळोजा कारागृहात हजेरी लावली आहे अशी माहिती त्याच्या वकिलांनी यावेळी कोर्टात सांगितली. तथापि तेथील अधिकाऱ्यांनी त्याला करोनास्थितीमुळे तेथे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पॅरोलची मुदत वाढवून देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी कोर्टात केली.
त्यानुसार शेवटची संधी म्हणून त्याचा पॅरोल पाच दिवसांनी वाढवण्यात आला आहे. गवळी 2008 पासून जन्मठेपेची शिक्षा नागपूर मध्यवर्ती कारागृहात भोगत आहे. त्याला आता नवीन आदेशानुसार 31 मे पर्यंत नागपूर मध्यवर्ती कारागृहात उपस्थित राहावे लागणार आहे.