पुणे – करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यातील प्रमुख दहा महापालिकांमध्ये आतापर्यंत मुंबई पाठोपाठ पुणे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, केंद्र शासनाने नुकत्यातच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे महापालिकेने पुण्यास मागे टाकले आहे. 27 मेअखेर ठाणे महापालिकेतील रुग्णांचा आकडा 6 हजार 939 वर गेला आहे. तर पुण्यात 4,998 आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे राज्याचे मुख्यसचिव तसेच सर्वाधिक रुग्ण असलेल्या महापालिकेच्या आयुक्तांची बैठक घेतली. यावेळी केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली. राज्यात पुण्यात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे.
तर पुण्यापाठोपाठ मुंबईतही रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या पुण्याच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याने आतापर्यंत राज्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांतच करोनाचा प्रादुर्भाव जास्त होता.