पुणे – विद्यार्थ्यांना घरी बसून ई-साहित्याच्या मदतीने अभ्यास करता यावा यासाठी त्यांना शैक्षणिक ई-साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या दृष्टीने शिक्षकांसाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.
राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनही करण्यात आलेला आहे. मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत. आता नवीन शैक्षणिक वर्षाला लवकर सुरुवात होणार आहे. त्यात ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा यंदा धडाकाच लावण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रगत होण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेस पूरक शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती व त्याचा वापर करण्यात येणार आहे. शाळेमध्ये शिक्षकांना उपयोगी ठरेल व विद्यार्थी घरी असताना त्यांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांना सहाय्यभूत ठरेल असे ई-साहित्य निर्मितीसाठी स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.कमलादेवी आवटे यांनी नियोजन केले आहे. सर्व अधिकाऱ्यांमार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचविण्याची कार्यवाही करावी.
तालुकास्तरीय परीक्षण समिती स्थापन करणे व इतर आनुषंगिक कामकाज पूर्ण करणे याबाबत संबंधिताना योग्य ते आदेश देण्यात यावे, अशा सूचना आवटे यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड माहापलिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत.
इयत्ता पहिली ते दहावीला अध्यापन करणाऱ्या मराठी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या, शासन मान्यता प्राप्त शाळांमधील मान्यता प्राप्त शिक्षकांसाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. इयत्ता पहिली ते दुसरी, तीसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी अशा चार गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. ई-साहित्य हे फक्त व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप, पीपीटी या प्रकारात तयार करावे लागणार आहे. चार मिनिटापासून दहा मिनिटांपर्यंतची मर्यादा असणार आहे. मराठी माध्यमाच्या कोणत्याची विषयांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील पाठांच्या अध्ययन-अध्यापनासाठी साहिती उपयोगी असणे आवश्यक आहे. गुगल ड्राइव्ह, यु ट्युब व इतर डिजीटल स्टोरेजवर साहित्य लोड करुन त्याची लिंक नोंदणी फॉर्मद्वारे सादर करावी लागणार आहे.
स्पर्धेत ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी 27 मे ते 6 जून अशी मुदत देण्यात आलेली आहे. ई-साहित्याची तालुकास्तरावर छाननी व परीक्षण करण्यासाठी 8 ते 11 जून अशी मुदत आहे. जिल्हास्तरावर 13 ते 18 जून या कालावधीत परीक्षण होणार आहे. आकर्षक मांडणी, विद्यार्थी कृतीवर भर, मनोरंजकता, संकल्पना, आकलन, सुलभता, तांत्रिक दृष्टया अचूकता या निकषावर गुणदान करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 जून रोजी स्पर्धेचा अंतिम निकाल घोषित होणार आहे.