हडपसर – हडपसर परिसरातील किमान एक हजार ते दोन हजार कष्टकरी कामगार, मजूर आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. हे सर्वजण परिसरात भाडेतत्त्वावर राहत होते, यातील बहुतांशी जणांनी आपल्याकडील सर्व सामानासह गाव गाठल्याने हडपसर परिसरातील अनेक चाळी, खोल्या रिकाम्या पडलेल्या असताना अनेकांचे गेल्या एक-दोन महिन्यांचे भाडेही थकले होते. यामुळे घरमालकांना असाही फटका बसला आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात वाहतूक सेवा सुरू झाल्याने परिसरातील अनेक परप्रांतीयांनी गाव गाठले आहे. यातून चाळी, खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. यापूर्वीही अनेकांनी रात्री-मध्यरात्री हडपसर सोडले आहे. यातून असे भाडेकरूंचे एक, दोन महिन्यांचे भाडे न देताच निघून गेले आहेत.
हडपसर परिसरातही परप्रांतीयांची मोठी संख्या होती. भेकराईनगर, रामटेकडी या भागात अशांची संख्या अधिक होती. काहींनी गावी पोहचल्यावर खोलीचे भाडे पाठवून देतो, गुगल पे करतो असे सांगितले असले तरी जो पर्यंत पैसे येत नाही तो पर्यंत काही खर नसल्याचे घरमालक सांगत आहेत. चार ते सहा हजार रूपये एका खोलीला भाडे असल्याने शेकडो परप्रांतीय तसेच गावी गेल्याने झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो, असे घरमालक सांगतात.