वॉशिंग्टन: अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत एच-1 बी व्हिसाधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यांच्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी संपणार नसून उलट त्यांना जास्तीत जास्त रोजगार संधी मिळेल, असे अमेरिका सरकारमधील एक सदस्याच्या हवाल्याने स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा प्रकारचा व्हिसा घेत अमेरिकेत नोकरीसाठी आलेल्या व येत असलेल्या लोकांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यात गेल्या पाच वर्षांपासून गेल्या 2 दशांपेक्षाही जास्त वाढ झालेली आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने भारतीयांच्या नोकऱ्या संकटात सापडणार असल्याचे अनेकांचे मत असले तरीही असे काहीही होणार नाही असे एका पाहणीत समोर आले आहे. भारताप्रमाणे अमेरिकेतही स्थानिकांना नोकरीच्या संधीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी गेले दोन वर्षे केली जात आहे. एच-1 बी व्हिसाधारक ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत तीथे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होणार असल्याने त्यांना डावलले जाणार नाही हे देखील स्पष्ट होत आहे.
ट्रम्प सरकार येत्या काळात एच -1 बी व्हिसावर आणखी कठोर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेत येणारे परदेशी संगणकतज्ञ, संशोधक, एमएस करण्यासाठी येणारे पदवीधर युवक व त्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी यांमुळे स्थानिकांच्या मुलभूत हक्कांवरच गदा येते अशी टीका देखील अनेकदा करण्यात आली आहे. त्यामुळेच ट्रम्प सरकार या व्हिसाचे नियम कडक करण्याबाबत सध्या चाचपणी करत आहे. ज्या अमेरिकन कंपन्या परदेशी व्यक्तींना नोकरी देतात त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना हा व्हिसा आवश्यक असतो.
मूळ अमेरिकेतील कर्मचारी ठरावीक रकमेच्या पगाराव्यतरीक्त कमी पगारावर काम करण्यास तयार नसतात हा अनुभव लक्षात घेत गेल्या दोन दशाकांपासून या कंपन्या भारत व चीनच्या युवकांना नोकरी देतात. अशी नोकरी मिळविण्यासाठी दरवर्षी हजारो युवक अमेरिकेत येत असतात. त्यांच्यामुळेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात असेही आरोप केले जात आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. उलट एच-1 व्हिसाधारकांमुळे स्थानिकांना जास्त रोजगार मिळतो असे स्पष्ट झाले आहे.
भारतीयांचेच प्रमाण जास्त
अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत ज्या परदेशी व्यक्तींना रोजगार दिले गेले त्यात सर्वाधिक भारतीय नागरिक आहेत. तसेच एच-1 बी व्हिसासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत त्यातही भारतीयांचेच प्रमाण जास्त असल्याचे नागरिकत्व व इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल 2010 ते 2018 या कालावधीतील पाहणीवरुन तयार करण्यात आला आहे.